विमानतळ : पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना निवेदन देताना माजी नगरसेवक राहुल भंडारे आणि नागरिक.
विश्रांतवाडी – विमाननगर भागातील अवैध धंदे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. विमाननगर मिनी बँकॉक झाले आहे का, त्या देशात अवैध धंद्यांना रितसर परवानगी आहे, तशी परवानगी आपल्या पोलिसांनी दिली आहे की काय, असे सवाल नागरिक करू लागले आहेत. याची गंभीर दखल घेत भाजपचे महामंत्री माजी नगरसेवक राहुल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विमाननगर मधील ज्येष्ठ नागरीक आणि विविध सोसायटीचे चेअरमन यांनी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले.
मटका धंदे, पत्त्याचे क्लब, रात्रीचे नियमबाह्य सुरू असणारी हॉटेल, रात्री १२ नंतर रस्त्यावर कर्कश आवाज करुन फिरणारे आणि रात्रभर गांजा, सिगारेट व दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना आळा घालण्याचे आवाहन भंडारे यांनी केले. सोसायटीमधील उपस्थितांनी आपल्या व्यथा पोलीस ठाण्यात मांडल्या. जर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्वजण राहुल भंडारे यांच्यासह रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला.
यावेळी कोनार्कनगर सोसायटीचे चेअरमन संदीप सिंह, गोल्ड कॉस्ट सोसायटीचे पवन शर्मा, ज्योती शिंदे, राजेश बागमार, विजय परिहार, सोनू चौधरी, फैजल, येवले काका, सुभाष कांबळे, वाणी व विमाननगरमधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.