पुणे – एकीकडे एल निनो परिस्थिती आणि आता सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्याचे हवामान पुरते बिघडले आहे. त्यामुळे हिवाळा असूनही थंडी गायब असल्याच दृश्य आहे.जागतिक हवामान अभ्यासक संस्थांच्या अभ्यासानुसार प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान वाढीची स्थिती सध्या उच्च पातळीवर आहे. म्हणजेच एल निनो परिस्थिती “स्ट्राॅंग’ झाली आहे. त्यामुळेच जगभरात उष्णतेचे नवनवीन उच्चांक नोंदवले जात आहेत.
यंदाचा आॅक्टोबर हा आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना म्हणूनही नोंदवला गेला आहे. वास्तविक याच काळात भारतात हिवाळा सुरू होत असतो. यंदा मात्र याच्या उलट स्थिती दिसून आली. आतादेखील नोव्हेंबर संपत आला असून डिसेंबर उजाडत आहे. पण, हुडहुडी भरायला लावणारी थंडी गायब असल्याचे चित्र आहे.
याबाबत पुणे हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात पुढील आठवडाभर कमाल आणि किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक राहणार आहे. शिवाय, याच काळात काही ठिकाणी आकाश ढगाळ राहू शकते. त्यामुळे थंडीची शक्यता तूर्त नसल्याचे सांगितले जात आहे.
किमान तापमान वाढलेलेच
दरवर्षीच्या आकड्यांनुसार पुणे आणि परिसरात आॅक्टोबर- नोव्हेंबर काळात पुण्याचे किमान तापमान १६ ते १७ अंशांच्या आसपास असते. पण, यंदा हा पारा सरासरी १९ ते २० अंशांदरम्यान राहिला आहे. क्वचित वेळा तो १७ अंशांच्या आसपास राहिला. म्हणजेच रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा कमी राहून तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. तर, हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार मंगळवारी पुण्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा ६ अंशांनी अधिक नोंदवले गेले आहे.