Pune News : पुणे-नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ टँकर उलटून मोठ्या प्रमाणात वायुगळती (ईथलिन ऑक्साईड ) झाली. पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
या आपघतानंतर मोठया प्रमाणात आग आणि स्फोट होण्याचा धोका आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीचे तंत्रज्ञ तेथे पोहोचेपर्यंत टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. नगर रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त टँकर एका गॅस कंपनीचा असून तो पुण्याहून नगरच्या दिशेने जात होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास टँकर वडगाव शेरी चौकालगत आला आणि चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पुणे-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वडगावशेरी चौक ते विमाननगर चौक रस्ता बंद करण्यात आला आहे. या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार वर्गाला बसत आहे. कामावर वेळेत जाण्यासाठी नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील वाहतूक सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.