मनपा विभाग-क्षेत्रीय वादात समस्येकडे दुर्लक्ष
धनकवडी – पुणे महापालिकेच्या दोन विभागांतील धोरणांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याल्याची स्थिती धनकवडी परिसरामध्ये निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून रामकृष्ण हॉस्टेल चौकानजीक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या जवळील ड्रेनेज लाइन फुटली असून त्यातून सांडपाणी वाहत आहे.
महापालिकेच्या धोरणामुळे आधी हे काम 18 मीटर असलेल्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाइन हे मुख्य खाते ड्रेनेज विभाग यांनी करणे अपेक्षित होते. तीन दिवसानंतर त्यांना उपरती झाली की, ही लाइन 600 मि.मी. व्यासाची कमी असल्याने हे काम क्षेत्रीय कार्यालयाने करावे.
पुन्हा हे काम क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. यात गेल्या आठ दिवसांपासून हे काम पालिकेच्या प्रशासकीय कामाच्या चौकटीत अडकून पडले आहे. याकालावधीत या परिसरात मच्छर, किटकांचा प्रादूर्भाव वाढला असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. ड्रेनेज विभागाच्या या धोरणामुळे नागरिकांचे आरोग्यला धोका निर्माण झाला आहे.
त्रिमूर्ती चौक जवळील राम कृष्ण हॉस्टेल येथील ड्रेनैजचे वाहत असलेल्या पाणी याबाबत तक्रारी आल्यानुसार दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्या दुपारपर्यंत वाहणारे सांडपाणी थांबविण्यात येईल.
– राजेंद्र नगरे, उपअभियंता, मनपा पुणे
सांडपाणी रस्त्यावर वाहत असून अनेकदा तक्रारी करून देखील सर्रास दुर्लक्ष केले गेले आहे. मुख्य खाते व क्षेत्रीय खाते यांच्यापैकी कोणी काम करावे. यातच अजून प्रशासनाचा वेळ चालला आहे.
– विशाल तांबे, माजी अध्यक्ष स्थायी समिती. पुणे मनपा