प्रा. मधुकर राळेभात यांचा उपोषणाचा इशारा
जामखेड – गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरु असलेल्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदाराने देखील या कामाकडे पाठ फिरवली असून कर्मचाऱ्यांच्या जीवावर कोट्यवधी रुपयांच्या काम सोपवले आहे. या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे व वेगाने व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दि. 16 नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जामखेड-सौताडा या महामार्ग 548 या रस्त्याचे काम जामखेड शहरात चालु आहे, मात्र हे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप प्रा.राळेभात यांनी केला. अंदाजपत्रकानुसार काम होत नाही निविदेप्रमाणे रस्ताचे खोदकाम नाही, गरज नसताना कोठारी पंप ते विंचरणानदी या सरळ रस्त्याला लहान वळणे दिली ते सरळ करावीत, कॉंक्रिटकरणाचे योग्य झालेल नाही.
अंदाजपत्रकानुसार नाही, पर्यायी वाहतूक व्यवस्था न करता रस्त्याची खोदाई करून वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. विंचरणानदी ते पंचायत समितीसमोर या ठिकाणाची गटारी नागमोडी केली आहे. ती त्वरीत सरळ करणे, संबंधित कामाची सरकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली नाही, आदी मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, प्रा. राजेंद्र पवार, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, प्रशांत राळेभात, अमित जाधव, कुंडल राळेभात, हरिभाऊ आजबे आदी उपस्थित होते.