सांगवी – पिंपळे गुरवमधील अमृता कॉलनीतील काम रखडल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली पिंपळे गुरव परिसरातील अंतर्गत रस्त्याची कामे जैसे-थे अवस्थेत आहेत. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी, तक्रार करूनही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अमृता कॉलनीतील रस्ता गेल्या दीड दोन वर्षांपासून उखडून ठेवला आहे. त्यामुळे चेंबर वर आले आहेत. तसेच तात्पुरती मलमपट्टी म्हणून टाकण्यात आलेल्या खडीचा दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले यांना त्रास सहन करावा लागत आहे.
याच कॉलनीत मोठी शाळा आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दररोज या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी सायकल घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
मुळात कोणत्याही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी तो रस्ता लगेच पूर्ववत करता येईल का? नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का? असे काहीही न पाहता महापालिका प्रशासन रस्त्याची खोदाई करण्यास सुरुवात करते. त्यानंतर मात्र वेगवेगळी कारणे देत कामात दिरंगाई केली जाते. महापालिका प्रशासनाने अमृता कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांची रोजच्या त्रासातून मुक्तता करावी.
– शाम जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.