Yogi Adityanath : छत्तीसगडच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसला अयोध्येत राम मंदिराची उभारणी नको असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपने दिग्गज नेत्यांना निवडणूक प्रचारात उतरवले आहे. या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री योगी सुकमा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यांच्या निशाण्यावर राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेस होता.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित करताना, “काँग्रेस अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या बाजूने नाही. काँग्रेसला देशावर राज्य करण्यासाठी बराच कालावधी मिळाला. मात्र मंदिराच्या उभारणीत त्यांनी अडथळे निर्माण केले. राम मंदिर बांधण्याचा काँग्रेसचा विचार असता तर ते काम खूप आधी पूर्ण झाले असते. पुढे बोलताना त्यांनी, ‘काँग्रेसच्या राजवटीत रामभक्तांना मारहाण झाली. प्रभू रामाच्या अस्तित्वावर काँग्रेसवाले प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेस नेत्यांची ही काही नवी चाल नाही, असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटले,” याआधीही काँग्रेसला रामाच्या अस्तित्वाबद्दल शंका होती. त्यामुळे काँग्रेसकडून राम मंदिर बांधण्याची अपेक्षा कशी करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रभू रामाचे भव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छत्तीसगड दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी उत्तर बस्तरमधील कांकेरच्या भानुप्रतापपूर विधानसभा, राजनांदगाव गावची डोंगरगढ विधानसभा, कावर्धा (कबीरधाम) येथील पंढरिया विधानसभा आणि कावर्धा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आणि रोड शोचा कार्यक्रम होता. आज (५ नोव्हेंबर) त्यांनी सुकमामध्ये भाजप उमेदवारासाठी मते मागितली. जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला फैलावर घेतले.