जिल्ह्यातील 7 हजार 718 अंगणवाडीसेविका, मदतनीसांची दीपावली गोड
पुणे – जिल्ह्यातील 7 हजार 718 अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी आणि अंगणवाडी मदतनीस यांना यंदा दिवाळीपूर्वी “भाऊबीज रक्कम’ दिली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे. येत्या पाच दिवसांत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाकडून जमा केली जाणार आहे.
शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गर्भवती महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधन म्हणून या कर्मचाऱ्यांना “भाऊबीज भेट’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पुणे जिल्हा परिषदेला अंगणवाडी सेविकांसाठी 1 कोटी 54 लाख 36 हजार रुपये राज्य शासनाने भाऊबीज रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना ही रक्कम दिवाळीपूर्वीच देण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातल 7 हजार 718 अंगणवाडी सेविकांना दिवाळीनिमित्ताने रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आरोग्य सेविकांना येत्या मंगळवारपर्यात दोन हजार रुपये देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्राधान्य जिल्हा परिषदेचे राहील. दिवाळीपूर्वीच आरोग्य सेविकांना ही भाऊबीज भेट प्राप्त होईल.
– जामसिंग गिरासे, महिला व बालकल्याण विभाग अधिकारी