वडगाव मावळ – मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा आरक्षणासाठी आपण आमदार म्हणून सर्वस्व पणाला लावू. आरक्षणासाठी राज्यातील सर्व मराठा आमदारांनी एकत्र यावे, असे आवाहनही आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
याबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, मराठा आरक्षण क्रांतीची मशाल धगधगत ठेवण्याकामी आपण सुरवातीपासून अखेरपर्यंत सकल मराठा समाजाबरोबर होतो आणि न्याय हक्क मिळेपर्यंत असणार आहे. या लढ्यात राज्यातील सर्व आमदारांनी सामिल होण्यासाठी मंत्रालयासमोर एल्गार केला आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांना विधीमंडळातील सर्व आमदार पाठिंबा देतील, याची मला पूर्ण खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा तातडीने करण्याची विनंती केली आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा ठराव पारित करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून त्यांच्याकडूनही तातडीने मंजुरी घेऊन महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करावे, ही आपली भूमिका असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
जगाला आदर्श ठरलेले शांततापूर्ण मोर्चे डोळ्यासमोर ठेवून आपले आंदोलन सुरू ठेवावे. पण कोणत्याही प्रकारे आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, अशी कृत्य न करण्याचे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलनात मीही सहभागी होतो. परंतु पोलिसी बळाचा वापर करून आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले, याचा मी निषेध करतो. मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की मराठा समाजाच्या न्याय-हक्काच्या मागण्यांचा त्वरित विचार करावा.
– सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा