Akhilesh Yadav – लोकसभेवर निवडून गेल्याने समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होणार असल्याचे सूचित होत आहे.
उत्तरप्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश विजयी झाले. आता त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी ते उत्तरप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळत होते. आता सपला अखिलेश यांच्या जागी नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागेल.
यावेळी उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षणीय ठरला. त्या राज्यात सपने लोकसभेच्या सर्वांधिक जागा जिंकल्या. उत्तरप्रदेशातील ८० पैकी ३७ जागा सपने पटकावल्या. तर, मित्रपक्ष कॉंग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे त्या राज्यात भाजपची मोठी पीछेहाट झाली.
तो निकाल कॉंग्रेस, सप आणि इतर विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीचा उत्साह वाढवणारा ठरला. उत्तरप्रदेशातील यशामुळे सप हा कॉंग्रेसनंतर इंडियामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. त्याचाच विचार करून अखिलेश राष्ट्रीय राजकारणात अधिक योगदान देण्यासाठी सज्ज झाल्याचे मानले जात आहे.