पिंपरी – सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे शहरात पडसाद उमटताना दिसत आहेत. शहराच्या काही भागांमध्ये मंगळवारी बंद पाळण्यात आला. तसेच ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता शहरातही जाणवू लागली आहे. सोमवारी सायंकाळी आंदोलकांनी दिघी परिसरात टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. मंगळवारी (दि. 31) किवळे, रावेत, निगडी, तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, भोसरी, दिघीसह चऱ्होली आणि लगतच्या 12 वाड्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, डांगे चौक भागात तुरळक प्रमाणात बंद पाळण्यात आला.
मराठा आरक्षण देण्यास सरकारकडून उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांनी राज्यातील जाळपोळ आणि हिंसक कृत्याचा इनकार केला असला तरी बहुतांश शहरांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यावर वेळीच सतर्क होऊन पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाळण्यात आला.
उपनगरांमध्ये साखळी उपोषण सुरुच
जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण करण्याचे आवाहन केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर शहराच्या उपनगरांमध्ये उपोषणाला सुरुवात झाली. भोसरीत सकल मराठा समाजाने एक दिवसीय उपोषण केले. चिखली, वाकड, पिंपळे निलख, रहाटणी, दापोडी, मोशी, दिघी, वाल्हेकरवाडी आदी भागात साखळी उपोषण करण्यात आली. आज बुधवारी (दि. 1) पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींची निवासस्थानाबाहेर बंदोबस्त
राज्यातील वेगवेगळ्या भागात लोकप्रतिनिधींच्या घरावर झालेले हल्ले पाहता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील आमदार व खासदारांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता. सुदैवाने शहरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही.