सिंहगडरस्ता -सिंहगड रस्ता भागामध्ये वडगाव बुद्रुक हिंगणे धायरी यामधील काही भाग हा बीडीपी झोन आहे. येथे पुणे महापालिकेकडून नियमितपणे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येते. परंतु, कारवाई करताना प्रशासकीय, शासकीय तसेच राजकीय भेदभाव केला जात असल्याचा आरोप करीत आज वडगाव बुद्रुक भागात माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय सर्वपक्षीय लाक्षणिक ऊपोषण करण्यात आले.
यावेळी चरवड म्हणाले की, प्रशासनाने कारवाई करताना सर्व सामान्य नागरिकांकरिता सहानुभूती दाखवली पाहिजे. आपल्या हक्काच्या घरासाठी सामान्यमाणूस आपली आयुष्यभराची कमाई वापरतो आणि घर पूर्ण होत आल्यावर प्रशासनाकडून त्यावर हातोडा चालविण्यात येतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या या कारवाई विरुद्ध कायदेशीर लढा दिला पाहिजे. पालिका कारवाई करताना गरीब आणि श्रीमंत असा भेद करीत आहेत. श्रीमंतांची, धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी वडगाव भागातील बीडीपी धारकांनी प्रचंड गर्दी केली होती. माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, दीपक नागपुरे, धीरज घाटे, केदार जाधव, बाळासाहेब जाधव, राहुल पोकळे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे महत्त्वाचे…
- सिंहगड रोड भागातील टेकड्यांचा बीडीपीत समावेश
- बीडीपी झोन अंतर्गत 978 हेक्टर जमीन आरक्षित
- यातील 124 हेक्टर जमीन सरकारी मालकीची
- उर्वरित 853 हेक्टर जमीन खासगी मालकीची