काठमांडू – नेपाळमधील मानांग एअर कंपनीचे एक हेलिकॉप्टर आड डोंगराळ भागामध्ये कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक जखमी झाला, असे नेपाळच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या लुक्ला येथून प्रवाशांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर निघाले होते. इशान्य नेपाळमधील लोबुचे येथे हेलिपॅडवर उतरत असताना हे हेलिकॉप्टर थोडे भेलकांडले आणि नंतर त्याने पेट घेतला, असे नेपाळच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे उपसंचालक जगन्नाथ निरौला यांनी सांगितले.
या दुर्घटनेमुळे हेलिकॉप्टरचे पायलट प्रकाश सेधाई यांना दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी काठमांडूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
जुलैमध्ये अशाच प्रकारे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्ये वैमानिकासह एकूण 6 जण ठार झाले होते. या दुर्घटनेत मरण पावलेले परदेशी पर्यटक मेक्सिकोचे होते.