“सील’ केल्या पण लिलाव करता येईना; मिळकतकरावर पाणी सोडण्याची वेळ
पुणे – महापालिकेकडून मिळकतकराच्या थकबाकीपोटी यावर्षी जवळपास 1753 मिळकती “सील’ केल्या आहेत. मात्र, सील केलेल्या एकूण मिळकतींमध्ये तब्बल 227 मिळकती अनधिकृत असल्याने महापालिकेस या मिळकतींचा लिलाव करता येणार नाही. तर, दुसऱ्या बाजूला या मिळकती अनधिकृत असल्याने त्याला तीन पट दंड आकारण्यात आल्याने मिळकतधारकही कर भरण्यास पुढे येत नाहीत.
परिणामी, या मिळकती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा यावरून प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. या मिळकतींची थकबाकी 75 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हे पैसे वसूल न झाल्यास पालिकेस मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरम्यान, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लिलावही करता येईना…
महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न 1500 कोटींवर गेले असून महापालिकेस 31 मार्च 2024 अखेरपर्यंत 2500 कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, आधीच 40 टक्के सवलतीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने पालिकेने सील केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. त्या, अंतर्गत यावर्षी पालिकेने सुमारे 1753 मिळकती “सील’ केल्या असून त्यात, कायदेशीर प्रक्रीया करून मिळकतीवर पालिकेचा बोजा चढवून लिलाव करत 57 कोटींची थकबाकी वसूल केली जाणार आहे,
यातील सुमारे 202 मिळकतींचा लिलाव प्रशासनाने सुरू केला आहे. त्याच वेळी 227 अनधिकृत मिळकतींची थकबाकी जास्त असली तरी लिलाव करणे शक्य नाही. या मिळकती अनधिकृत असल्याने त्या मिळकती पालिकेस विकता येत नाहीत. तसेच, त्या अनधिकृत असल्या तरी थकबाकीसाठी “सील’ केल्याने पालिकेस कारवाई करून पाडणेही शक्य नाही.