Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गुरुवारी श्री बद्रीनाथ आणि श्री केदारनाथ धामला भेट दिली. यावेळी त्यांचा मुलगा अनंत अंबानी, त्यांची मंगेतर राधिका मर्चंट आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते. अंबानी कुटुंबाने मंदिरात पूजा- प्रार्थना केली. यानंतर अंबानी कुटुंबाने बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) 5 कोटी रुपयांचा धनादेशही दिला.
मुकेश अंबानी बद्रीनाथ आणि केदारनाथला पोहोचल्यावर बीकेटीसीने त्यांचे स्वागत केले. अंबानी आधी बद्रीनाथ आणि नंतर केदारनाथ धामला पोहोचले. बद्रीनाथमध्ये बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी अंबानींचे अंगवस्त्र भेट देऊन स्वागत केले. अंबानींनी बीकेटीसीला 5 कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम त्यांनी धनादेशाद्वारे बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी बीकेटीसीचे उपाध्यक्ष किशोर पनवार उपस्थित होते.
मंदिर प्रशासनाने दिली ही माहिती –
बीकेटीसीचे अध्यक्ष अजय अजेंद्र म्हणाले, “बद्रीनाथ दर्शनानंतर उद्योगपती मुकेश अंबानी केदारनाथ धामला पोहोचले. तेथे त्यांनी मंदिरात पूजा-प्रार्थना केली. केदारनाथमध्ये त्यांचे स्वागत केदारनाथ उत्थान चॅरिटेबल ट्रस्टचे जॉइंट सेक्रेटरी आणि बीकेटीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेंद्र सिंह यांनी केले. यादरम्यान लोक ‘हर हर महादेव’चा जयघोष करताना दिसले. त्याचवेळी अंबानी कुटुंबीय हात जोडून मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर आले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. यावेळी मुकेश अंबानी यांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले.
चारधाम यात्रेच्या सुरुवातीपासूनच चित्रपट, क्रिकेट, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील सेलिब्रिटीही केदारनाथचे दर्शन घेत आहेत. काही दिवसांपूर्वी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बाबा केदार यांचे दर्शन घेतले होते. सीएम योगींनी तिथे पूजा-प्रार्थनाही केली होती. त्याआधी क्रिकेटर ऋषभ पंतही वडिलांसोबत बाबा केदारच्या दर्शनाला पोहोचला होता. यावेळी चार धाम यात्रेत जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. आतापर्यंत 44 लाखांहून अधिक भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले आहे.
मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती –
फोर्ब्सने 2023 या वर्षासाठी भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे (Forbes India rich list 2023). रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती गौतम अदानी आहेत. फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 92 अब्ज डाॅलर आहे, तर गौतम अदानी 68 अब्ज डाॅलरचे मालक आहेत.