Sharad Pawar on Chandrshekhar Bawankule – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन मुद्द्यांवर सर्वाधिक चर्चा झाली. पाहिली म्हणजे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आणि दुसरी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात पुढे काय होणार याबाबतची चर्चा. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन टर्म खासदार आहेत. सुळेंना लोकसभेत पाठवण्यात बंधू अजित पवार यांची आतापर्यंत मोलाची साथ राहिली आहे. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली असून भाजपचा बारामती जिंकण्याचा विश्वास वाढल्याचं दिसतंय.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नुकतंच एक वक्तव्य करताना ५१ टक्के मतांसह बारामती जिंकू असा दावा केला आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बावनकुळे यांनी विजयाचं मार्जिनही सांगून टाकल्यानं यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar on Chandrshekhar Bawankule
बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी खास शैलीमध्ये फिरकी घेत, ‘आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. स्वत:ला पक्षाने संधीदेखील दिली नाही, त्या माणसाला काय महत्व द्यायचे,’ असा टोला लगावला. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे बडे नेते मानल्या जाणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. त्याचीच आठवण शरद पवार यांनी करून दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघाची रचना…
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे आहेत. तर बारामतीत स्वतः अजित पवार, इंदापूर येथे त्यांचेच कट्टर समर्थक दत्तात्रय भरणे आमदार आहेत. पुरंदर व भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप व संग्राम थोपटे हे आमदार आहेत.
सुप्रिया सुळेंना निवडणूक जड जाणार? |
२०१४ लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती. सुप्रिया सुळेंना त्यावेळी केवळ ६९ हजार मतांनी विजय मिळवता आला होता. मात्र २०१९ मध्ये भाजपने मित्र पक्ष रसपला बारामतीची जागा न सोडता स्वतः उमेदवार दिला. राहुल कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांनी सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा लढवली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार असल्या तरी अजित पवार यांचा बारामती लोकसभेवर त्यांच्यापेक्षा चांगला होल्ड असल्याचं नेहमीच बोललं जात. अशातच, अजित पवार हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यापासून दुरावले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणुक यंदा अत्यंत चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्यातरी दिसतंय.