चेन्नई – कपिल देव व लोकेश राहुल यांच्याबाबतीतील एक अनोखा योगायोग रविवारच्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात घडला. 1983 साली कपिल देव शॉवर घ्यायला गेले व तो पर्यंत भारताचे 9 धावांत 4 फलंदाज बाद झाले. त्यानंतर कपिल यांनी नाबाद 175 ही महान खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यंदाच्या स्पर्धेतही भारताची स्थिती 3 बाद 2 असताना राहुल शॉवर घेऊन नुकताच खेळपट्टीवर दाखल झाला होता. त्यानेही भारताला कपिल देव यांच्याप्रमाणेच विजय मिळवून दिला. त्याचवेळी अनेकांना कपिल देव व राहुल यांच्यातील हा अनोखा योगायोग आठवला.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होती. त्यात गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांवर रोखला गेला. मात्र, भारताची सुरुवातही अत्यंत निराशाजनक झाली. संघाचे तीन फलंदाज अवघ्या 2 धावा लकावर असताना बाद झाले. या तिघांनाही खातेही उघडता आले नाही. त्यानंतर एका बाजूला फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीला साथ देण्यासाठी राहुल फलंदाजीला आला व या दोघांनी दीडशतकी भागीदारी केली. कोहली 85 धावांवर परतल्यावर राहुलने नाबाद 97 धावांची खेळी करत हार्दिक पंड्यासह संघाचा विजय साकार केला.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी संपल्यावर मी थेट शॉवर घ्यायला गेलो. मात्र, शॉवर घेऊन बाहेर आल्यावर भारताचा डाव सुरु झाला आणि काही क्षणातच तीन फलंदाज बाद झाले व मला तातडीने खेळपट्टीवर जावे लागले. शतक हुकल्याची खंत आहे मात्र, संघाच्या विजयासाठी माझी खेळी मोलाची ठरली त्याचा आनंद जास्त आहे, असे राहुलने सांगितले.
1983 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेतही जवळपास अशीच स्थिती होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या त्या सामन्यात कपिल देव शॉवर घ्यायला गेलेले असताना भारताने अवघ्या 9 धावांत 4 फलंदाज गमावले होते. त्यावेळी कपिल देव तातडीने बाहेर आले व लगेचच खेळपट्टीवर गेले . त्यानंतर कपिल देव यांनी 175 धावांची नाबाद व अजरामर खेळी केली. त्यावेळी बीबीसीचा संप असल्यामुळे कपिल यांची ती खेळी अनेकांना पाहता आली नाही. मात्र, रविवारी राहुलच्या खेळीतून तसेच या सामन्यात घडलेल्या स्थितीमुळे या दोन्ही खेळींमधील हा योगायोग चर्चिला जाऊ लागला.
Kapil Dev was having a shower when he got to know India are 9/4 in the 1983 World Cup.
KL Rahul just had a shower and came to bat when India were 2/3 in the World Cup 2023.
– Match winning knocks by both the individuals after taking a shower…!!! pic.twitter.com/G1sKGp0lBs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
विश्वकरंडक मिळणार का?
कपिल यांच्यावेळी जे घडले होते तसेच काही प्रमाणात यंदा राहुलच्या खेळीतही घडले. त्यावेळी कपिल यांनी खेळी करत भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हानही कायम राखले होते व पुढे जाऊन 1983 सालची ती विश्वकरंडक स्पर्धा भारतानेच जिंकली होती. तसाच योगायोग यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या बाबतीतही घडणार का, असा गंमतीशीर प्रश्न सध्या अनेत चाहत्यांना पडला आहे.