पुणे – अपार्टमेंटच्या पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील अध्यादेश स्वरूपात विधेयक आणण्यात येणार आहे, या निर्णयामुळे अपार्टमेंटमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग मिळणार आहे.
अपार्टमेंटचा पुनर्विकासास विरोध करणाऱ्या रहिवाशी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरिता स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात येणार आहे. अधिनियमात त्याप्रमाणे कलम 6 (अ) नंतर कलम 6 (ब) समाविष्ट करण्यात येणार आहे. या अधिनियमात 7 जुलै 2018 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणात बहुसंख्य सदनिका मालकांची संमती आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बहुसंख्य या शब्दाची व्याख्या 51 टक्के सदनिका मालक अशी आहे. कलम 6 नुसार बहुसंख्येने पारित केलेल्या प्रस्तावास काही सदस्यांचा विरोध होतो आणि त्यामुळे असहकार करणाऱ्या सभासदांविरुद्ध कोणती कार्यवाही करावी याची सुस्पष्ट तरतूद नसल्यामुळे पुनर्विकास खोळंबून इमारती धोकादायक होतात. याबाबत महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टमध्ये तरतूद नाही, त्यामुळे नव्याने निष्कासनाबाबतची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.