#CWC23 IND vs NED Warm Up : तिरुअनंतपुरममधील भारतीय संघाचा दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द झाला आहे. गुवाहाटीनंतर इथेही पावसाने चाहत्यांची मने तोडली. या दोन्ही शहरांतील चाहत्यांना वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला त्यांच्या देशात खेळताना पाहायचे होते, पण तसे झाले नाही. गुवाहाटीमध्ये टाॅस झाला होता, पण तिरुअनंतपुरममध्ये तोही होऊ शकला नाही.
भारतीय संघ आता एकही सराव सामना न खेळता थेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उतरेल. तिरुअनंतपुरममधील मंगळवारी (३ ऑक्टोबर) होणारा दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. याआधी, 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्धचा पहिला सराव सामनाही पावसामुळेच रद्द करण्यात आला होता.
UPDATE: The warm-up match between India & Netherlands is abandoned due to persistent rain. #TeamIndia | #CWC23 https://t.co/rbLo0WHrVJ pic.twitter.com/0y4Ey1Dvye
— BCCI (@BCCI) October 3, 2023
भारतीय संघ आता 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. भारताला 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकण्यात यश मिळाले होते.
विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. 10 पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.