Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. घोडेस्वारीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचत सुवर्ण कामगिरी केली आहे.
दरम्यान, हृदय छेडा, दिव्यकृती सिंग, अनुष अग्रवाल आणि सुदीप्ती हाजेला यांच्या भारतीय मिश्र संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. या चौघांनी मिळून घोडेस्वारीत इतिहास रचला आहे.कारण एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने 41 वर्षांनंतर घोडेस्वारी ड्रेसेज सांघिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.(Asian Games: India make history, claim first gold medal in Team Dressage) चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे.
भारताची गुणसंख्या(घोडेस्वारी)
1. भारत – 209.205 गुण
2. चीन – 204.882 गुण
3. हाँगकाँग- 204.852
भारतीय संघाने 209.205 गुण मिळवून चीनचा पराभव केला. चीन 204.882 गुणांसह दुसऱ्या तर हाँगकाँग 204.852 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. भारताने 41 वर्षांनंतर घोडेस्वारी ड्रेसेज स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारताने शेवटचे पदक 1982 मध्ये जिंकले होते.
देशाला पहिल्या दिवशी पाच तर दुसऱ्या दिवशी सहा पदके मिळाली. एकूण 14 पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदके आहेत.तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.
भारतीय घोडेस्वारी संघाने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. यापूर्वी भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पवार आणि ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर निशाणा साधला. तर दुसरे सुवर्णपदक भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नावावर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.