नवी दिल्ली – वर्ष 2003 मध्ये हिंदीमधील सुप्रसिद्ध कवयित्री मधुमिता शुक्ला यांच्या खळबळजनक हत्येप्रकरणी दोषी ठरलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि गुंड-राजकारणी झालेले अमरमणी त्रिपाठी यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की अमरमणी आणि त्यांची पत्नी 2007 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, परंतु तुरुंगातील “चांगल्या वर्तनाच्या” आधारावर त्यांची सुटका केली जाईल.
राज्याच्या तत्कालीन मायावती सरकारमधील मंत्री अमरमणी त्रिपाठी यांच्याकडे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुखाचा उजवा हात म्हणून पाहिले जात होते. त्रिपाठी यांनी सुरुवातीला असा दावा केला होता की या भीषण हत्येशी आपला काहीही संबंध नाही. तथापि, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने केलेल्या डीएनए चाचणीत गोळ्या झाडण्यात आल्याच्या वेळी मधुमिता शुक्ला ही गर्भवती होती आणि तो गर्भ अमरमणीमुळेच राहिल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्रिपाठी दामप्त्याला बचावाची कोणतीही संधी मिळाली नव्हती.
काव्यविश्वात प्रसिद्ध नाव बनलेल्या प्रख्यात कवयित्री मधुमिता शुक्ला यांची 9 मे 2003 रोजी हत्या झाली होती. लखनऊच्या निशातगंज भागात मधुमिताचा मृतदेह तिच्या घरी आढळून आला. मधुमिता शुक्ला 24 वर्षांची होती आणि कथितरित्या अमरमणी त्रिपाठीची गर्लफ्रेंड होती.
अमरमणी त्रिपाठी हे चार वेळा आमदार झाले होते. त्यांचा विविध राजकीय पक्षांशी संबंध होता आणि त्यांचा बराच प्रभाव होता. या कारणास्तव, अमरमणी न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतात, अशी भीती मधुमिता शुक्लाच्या कुटुंबीयांना वाटत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने खटला लखनौहून डेहराडूनला वर्ग केला होता.
मधुमिताच्या बहिणीनेही कुटुंबाविरुद्ध कधीही न संपणाऱ्या धमक्यांबद्दल सांगितले होते. ही केस उत्तर प्रदेशातून शेजारच्या उत्तराखंड राज्यात हस्तांतरित झाल्यानंतरही धमक्या सुरूच होत्या. मायावती यांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता. परंतु मधुमिता शुक्लाच्या आईने अपील केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. अमरमणी त्रिपाठी, त्यांची पत्नी मधुमणी आणि इतर दोन आरोपी रोहित चतुर्वेदी आणि संतोष कुमार राय यांना डेहराडून न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.