नवी दिल्ली :- महेंद्रसिंह धोनीमुळेच रोहित शर्माला 2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही, असा धक्कादायक गौप्यस्फोट निवड समितीचे माजी सदस्य राजा व्यंकट यांनी केला आहे.
धोनीला रोहितच्या जागेवर पीयूष चावलाची निवड करायची होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही रोहितच्या समावेशासाठी आग्रही होते. मात्र, धोनीच्या मतासमोर त्यांनाही काही मत व्यक्त करता आले नाही. त्यावेळी रोहितला संघात स्थान न दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते.
रोहितचे एकदिवसीय संघातील स्थान कायम होते. मात्र, केवळ त्याच स्पर्धेसाठी त्याला का वगळले गेले हे अनेकांसाठी अनाकलनीय होते. तसेच 2007 सालच्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघात रोहितचा समावेश होता.
आम्ही 2011 सालच्या स्पर्धेपूर्वी संघ निवडीबाबत चर्चा करत होतो, त्यावेळी रोहितचे नाव आघाडीवरच होते. मात्र, जेव्हा संघाची निवड प्रक्रिया सुरू केली, त्यावेळी 1 ते 14 क्रमांकाच्या खेळाडूंची नावे जाहीर करत रोहितला 15 वा खेळाडू म्हणून ठेवले. मात्र, धोनीने त्याच्या जागेवर पीयूष चावलाला संधी द्यायची, असे मत व्यक्त केले.
कर्स्टन यांनीही धोनीच्या मताला पाठिंबा दिला. केवळ धोनीचे समर्थन नव्हते म्हणूच रोहितला त्यावेळी संघात स्थान मिळाले नाही, असेही राजा व्यंकट यांनी सांगितले.