पुणे – टिळक पंचांगानुसार आज (दि. 20 ऑगस्ट) पासून केसरी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले यांच्याकडून प्रथेप्रमाणे सकाळी 9 वाजता “श्रींची मूर्ती घेऊन पारंपरिक पालखीतून ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.
प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व केसरीचे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, विश्वस्त व्यवस्थापिका आणि केसरी गणेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख व विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक,विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच केसरीचे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी होतील.
रमणबाग चौक ते शिंदे पार चौक, ओंकारेश्वर मंदिरापासून वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकीमार्गे मिरवणूक केळकर रस्त्यावरून टिळकवाड्यात प्रवेश करेल. सकाळी 11.05 वाजता गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते आरती होईल. तर परिमंडळ 1 चे उपायुक्त संदीपसिंह गिल यावेळी उपस्थित असणार आहेत.
20 ते 30 ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव असेल. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवली जाईल. 19 सप्टेंबर (गणेश चतुर्थी) पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरुवात होईल.