नवी दिल्ली – राज्यसभेने सोमवारी कॉंग्रेसच्या खासदार रजनी अशोकराव पाटील यांचे निलंबन आवाजी मतदानाने मागे घेतले. रजनी पाटील यांना यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 10 फेब्रुवारी रोजी सभागृहाच्या कामकाजाची व्हिडिओग्राफी करून राज्यसभेच्या नियमांविरुद्ध सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. सुमारे सहा महिन्यांनंतर त्यांना हे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.
विशेषाधिकार समितीचा 74 वा अहवाल सादर करताना भाजप खासदार सरोज पांडे यांनी सांगितले की, विशेषाधिकार भंगासाठी पाटील यांना दोषी ठरवण्याची शिफारस समितीने होती. तथापि, रजनी पाटील यांचे सभागृहातील निलंबन पुरेसे मानले जावे आणि सोमवार ( 7 ऑगस्ट ) पासून ते मागे घेण्यात यावे, अशी शिफारसही समितीने केली आहे. त्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.