मुंबई – मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचा लुकही समोर आला आहे.
प्रसाद ओक ‘परिनिर्वाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या नव्या भूमिकेविषयी सांगितले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या चित्रपटामध्ये प्रसाद ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रसादने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याच्या या चित्रपटातील लुकची पहिली झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद खिडकीमध्ये पाठमोरा उभा असल्याचा दिसत आहे. तर त्याने सदरा आणि धोतर परिधान केले आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट शेअर करत प्रसाद ओकने लिहिले आहे की, “वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करुन “परिनिर्वाण” ची तयारी सुरु झालेली आहे… मोठ्ठया जबाबदारीची जाणीव झालेली आहे… महामानवाचा आशीर्वाद पाठीशी आहेच… तुमच्या शुभेच्छांची आणि प्रेमाची गरज आहे…!!!” या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेक जण हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. याशिवाय प्रसाद ओकचा ‘वडापाव’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु असून त्याचा व्हिडिओही त्याने इनस्टाग्रामवर शेअर केला होता.