बंगळुरू – कर्नाटकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कारवार तालुक्यात बुधवारी मोबाईल चार्जर चुकून तोंडात टाकल्याने आठ महिन्यांच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि संजना यांची मुलगी सानिध्या असे या मुलीचे नाव आहे. संतोष हुबळी वीज पुरवठा कंपनीत (हेस्कॉम) कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईल चार्ज केला होता पण चुकून स्वीच सुरू होते. मुलीने चार्जर तोंडात टाकताच तिला विजेचा जोराचा धक्का बसला.
यानंतर तिच्या पालकांनी तिला तात्काळ दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र सर्व प्रयत्न करूनही मुलीला वाचवता आले नाही आणि रुग्णालयाने तिला मृत घोषित केले. या प्रकरणी स्थानिक ग्रामीण पोलिस नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.