गोवाहटी :- आसामचा जलतरणपटू एल्विस अली हजारिका याने इंग्लिश खाडी दोन्ही बाजूंनी पोहून पार केली आहे. इंग्लिश खाडी दोन्ही बाजूंनी पोहून पार करणारा तो जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे.
इंग्लंडमधील हॅम्पशायरपासून ते फ्रान्समधील कॅलाईसपर्यंतची इंग्लिश खाडी पोहून पार करणे आणि नंतर लगेचच परत त्याच मार्गाने परत येण्याचे 78 किलोमीटरचे हे सागरी अंतर कापण्यासाठी एल्विनला 31 तासांचा अवधी लागला आहे. बुधवारी त्याची ही कामगिरी पूर्ण झाली.
“या कामगिरीसाठी मी दीर्घकाळापासून वाट बघत होतो. खूप कष्ट आणि दररोजच्या अनेक तास कठोर परिश्रमांनंतर हे साध्य करता आले आहे. इंग्लिश खाडी दोन्ही बाजूंनी पोहून जाणारा पहिला आसामी झाल्याचा आनंद वाटतो आहे.’ असे हजारिका याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सर्व भारतीयांसाठी आणि आसामसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. एक स्वप्न आज सत्यात उतरले आहे, असेही त्याने म्हटले आहे.
या प्रवासादरम्यान त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. जेली फिश, डॉल्फिन, सील, समुद्राचे खारे पाणी, वेगवान सागरी प्रवाह, खराब हवामान या सर्व गोष्टींचा त्याला सामना करावा लागला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी हजारिकाचे अभिनंदन केले असून हा क्षण आसामसाठी अत्यंत अभिमानाचा असल्याचे ट्विट केले आहे. हजारिकाचे हे यश सर्वांना प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी एल्विन आणि त्याचे पश्चिम बंगालमधील साथीदार रिमो साहा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये युरोपातील नॉर्थ चॅनेल पोहून “रिले’ पद्धतीने पार केले होते.
नॉर्दर्न आयर्लंड ते स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ खाडी “रिले’ पद्धतीने पोहून जाण्याची ही ऐतिहासिक कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. या शिवाय ही कामगिरी करणारे आपापल्या राज्यांमधील ते पहिले जलतरणपटू देखील ठरले होते. हजारिकाने 2019 मध्ये अमेरिकेतील कॅटलिना खाडी देखील पोहून पार करण्याची कामगिरी केली आहे.