नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे(डब्लूएफआय) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांना महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्या जामीन अर्जाला विरोध केला नाही. यानंतर दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवताना नंतर त्यांचा जामीन मंजूर केला.
“ब्रिजभूषण एक प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि या खटल्यातील साक्षीदारांवर ते प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांना तक्रारदारांशी किंवा साक्षीदारांशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधण्यास बंदी घालण्यात यावी,’
असे ब्रिजभूषण यांच्या जामिनासाठीच्या याचिकेला विरोध करताना कुस्तीपटूंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. यावर डब्लूएफआयचे वकिल राजीव मोहन यांनी उत्तर देताना,”ब्रिजभूषण यांच्यापासून साक्षिदारांना कुठलाही कोणताही धोका नाही,’ असे सांगितले.
यापूर्वी अंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी सरकारने स्थापन केलेल्या तपासणी समितीच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात दिल्ली न्यायालयाकडून ब्रिजभूषण यांना दिलासा मिळाल्याने अंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी हा धक्का मानला जात आहे.