वालचंदनगर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या महत्वकांक्षी चांद्रयान – 3 मोहिमेमध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे. चांद्रयानाच्या यशामुळे पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर कंपनीच्या माध्यमातून चांद्रयान -3 हे यान यशस्वीरित्या आकाशात झेपावल्याने परिसरातील कामगार व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
चांद्रयान मोहिमेच्या उड्डाणासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटला सहा बूस्टर मोटर्स होत्या. यातील चार बूस्टर मोटर्सची (एस-200) निर्मिती वालचंदनगर कंपनीत झाली आहे. यामध्ये हेड ऍन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्वाच्या उपकरणाचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे उड्डाणाच्या पहिल्या स्टेजसाठी वापरण्यात आली.
अनेक मोहिमांमध्ये सहभाग
यापूर्वी चांद्रयान – 1 व चांद्रयान – 2 मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा वाटा होता. तसेच मंगळयान मोहिमेत देखील वालचंदनगर कंपनीचे योगदान होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वालचंदनगर कंपनीचा देश उभारणीच्या कामामध्ये मोलाचा सहभाग राहिला आहे. एरोस्पेस, डिफेन्स, अणुउर्जा क्षेत्रामध्ये देखील कंपनी देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. कंपनीने पाणबुडीसाठी महत्वाचे असणारे अनेक भाग ही तयार केले आहेत.
वालचंदनगर उद्योग समूहाच्या माध्यमातून जल भूमी आकाश क्षेत्रात खूप मोठा सहभाग असून गगनयानामध्ये कंपनीचा सहभाग आहे. भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी महत्वाची उपकरणे बनविण्याचे काम वालचंदनगरमध्ये सुरु आहे. यातील काही उपकरणे कंपनीने तयार करुन इस्त्रोकडे हस्तांतर केली आहेत. तसेच अनेक उपकरणे बनविण्याचे ही काम सुरु आहे.
-चिराग दोशी, व्यवस्थापकीय संचालक वालचंदनगर कंपनी
गेल्या पाच दशकांपासून वालचंदनगर कंपनी एरोस्पेस क्षेत्राशी संलग्न काम करीत असून अनेक महत्वाची उपकरणे तयार करीत आहेत. चांद्रयान -3 मोहिमेच्या यशाबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी कंपनीतील इंजिनिअर, कामगारांचे अभिनंदन केले.
-धीरज केसकर, युनिट हेड वालचंदनगर कंपनी