पुणे – पुणे शहरात मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवले. यामध्ये खुद्द पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावर उतरुण कारवाईची पहाणी केली. या ऑपरेशन दरम्यान 129 कारवायांमध्ये तब्बल 165 गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये कोंम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हॉटेल, लॉजेस, धाबे, बस स्थानके, रेल्वे स्थानके तसेच सार्वजनीक ठिकाणी आढळलेल्या संशयीत व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांची पथके कारवाईसाठी तयार करण्यात आली होती. तर वाहतूक शाखेकडून 1822 संशयीत वाहनांची तपासणी करुन 568 वाहनांवर कारवाई करुन 4 लाख 63 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरोपींच्या तपासणी अभियानात 1994 गुन्हेगारांचा माग काढण्यात आला, त्यापैकी 695 गुन्हेगार मिळून आले. यातील 24 जणांना आर्मऍक्टनूसार अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 23 धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आली.गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये मपोका 145 कायद्याप्रमाणे एकास अटक करण्यात आले. अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक करुन गांजा आणि अफिम असे 1 लाख 75 हजार रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. मुंबई प्रोव्हिबीशन ऍक्ट प्रमाणे गुन्हे शाखेने 14 आणि पोलीस ठाण्याने 159 केसेस करुन 85 लाखाची गावठी दारु जप्त केली. महाराष्ट्र जुगार ऍक्ट प्रमाणे 55 आरोपींना अटक करुन सुमारे 60 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उप आयुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, उप आयुक्त संदीप सिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत ऑल आऊट ऑपरेशन (कोम्बिंग ) मध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले.