मुंबई – टीव्ही शो ‘नीरजा’च्या सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला. तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच अभिनेत्री मायरा वैकुळ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत काम करतेय. या टीव्ही शो च्या सेटवर दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच ‘नीरजा’च्या सुरुवातीचे काही भाग कोलकातामध्ये शूट करण्यात आले, त्यानंतर मुंबई फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोचे संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित होते. दरम्यान एक बिबट्या तेथे आला यावेळी गोंधळ उडाला.
मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या लोकांना दिसत आहेत. अनेकवेळा वन्य प्राणी सेटवर घुसले आहेत. यावेळीही तेच झाले. वृत्तानुसार, Neerja: Ek Nayi Pehchaan च्या सेटच्या बाल्कनीतून बिबट्याने प्रवेश केला. सेटवरून बिबट्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
सेटच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या माकडांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बिबट्याने सेटमध्ये प्रवेश केला. मात्र लोकांची गर्दी पाहून माघारी फिरले. बिबट्या तिथून दूर गेला असला तरी त्याला पाहून सेटवरील लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या सर्व गदारोळात माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वैकुळ सुरक्षित आहे.
वर्षभरापूर्वी शाहीर शेखच्या वो तो अलबेला या मालिकेच्या सेटवर एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यावेळी दुसरे युनिट काही लोकांसह शूटिंग करत होते आणि त्यांनी बिबट्याचा पाठलागही केला होता.