नवी दिल्ली – जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता बॉक्सर दीपक भोरिया (51 किलो) आणि निशांत देव (71 किलो) यांची शनिवारी मूल्यांकनानंतर चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष बॉक्सिंग संघात निवड करण्यात आली आहे.
2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता अमित पंघालला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. तसेच 48 किलो वजनी गटातील महिला विश्वविजेत्या नितू घनघास हिलाही महिला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
यासह, 2022 ची जागतिक कांस्यपदक विजेती परवीन हुड्डा (57 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जैस्मिन लांबोरिया (60 किलो), अरुंधती चौधरी आणि प्रीती पवार यांनी स्टार बॉक्सर निखत जरीन (51 किलो) आणि लव्हलिना बोरगोहेन (75 किलो) यांच्यासह महिलांच्या संघात स्थान मिळविले आहे. ही स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
दोन वेळची जगज्जेती निखत आणि टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लव्हलिना मार्चमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे आपोआप आशियाई खेळांसाठी पात्र
ठरल्या होत्या.
आशियाई बॉक्सिंग स्पर्धांना अधिक महत्त्व आहे, कारण या स्पर्धेतील कामगिरीद्वारे बॉक्सर्सला 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवता येणार आहे. पुरुषांमध्ये, अनुभवी शिवा थापा सुपर लाइटवेट गटात (63.5 किलो) देशाचे प्रतिनिधित्व करेल. तसेच, 2021 चा जागतिक युवा चॅम्पियन सचिन सिवाच 54 किलो गटावरून 57 किलोगटात पोहोचला आहे.
भारतीय बॉक्सिंग संघ :-
महिला : निखत जरीन (51 किलो), प्रीती पॉवर (54 किलो), परवीन हुडा (57 किलो), जास्मिन लांबोरिया (60 किलो), अरुंधती चौधरी (66 किलो), लव्हलिना बोरगोहेन (75 किलो).
पुरुष : दीपक भोरिया (51 किलो), सचिन सिवाच (57 किलो), शिवा थापा (63.5 किलो), निशांत देव (71 किलो), लक्ष्य चहर (80 किलो), संजीत 92 किलो, नरेंद्र बेरवाल (92+)