खेड शिवापूर – खेड शिवापूर येथे वेळूफाटा ते कोंढापूर फाटा शिंदेवाडी सेवा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. 24 आणि 25 ला सुरू झालेल्या पहिल्याच पावसामध्ये पुणे-सातारा मुख्य रस्त्यासह सेवारस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व खेड-शिवापूर टोलनाका ठेकेदार असलेल्या रिलायन्स इन्फ्रा यांच्या संथ गतीच्या कामांमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनधारकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवार (दि. 24) पासून पाऊस सुरू झालेल्या पावसामुळे खेड शिवापूर येथील सेवा रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दरम्यान ज्या वाहनधारकांनी पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला त्यांची वाहने बंद पडून वाहने ढकलून बाहेर काढावी लागली.
पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व खेड शिवापूर टोलनाक्यावरील ठेकेदारांनी सेवा रस्त्यांवरील गटारांची दुरुस्ती तसेच सफाई करणे गरजेचे होते. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, शिंदेवाडी ते खेड-शिवापूर टोलनाका व नसरापूर परिसर दरम्यानच्या रस्त्यांवर पाणी साचले होते.
या पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. या सेवा रस्त्यांवरील गटाराची कामे पूर्ण करून सफाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. या महामार्ग समस्येबाबत विचारणा केली असता प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
वारंवार सूचना करूनही या रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यावर पाणी साचत आहे.
-अस्लम खतीब, सहायक पोलिस निरीक्षक, जिल्हा महामार्ग विभाग
महामार्ग लगत असलेल्या हॉटेलधारकांनी गटारे बुजविली असून, त्यामुळे पाणी गटारांमध्ये न जाता रस्त्यावर येत आहे. यावर आम्ही आता काम करत असून लवकरच वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल.
– राकेश कोळी, अभियंता, महामार्ग प्राधिकरण
वारंवार सांगूनसुद्धा टोल प्रशासन काम करत नाही. फोन केल्यावर पाणी आमचे नाही आम्ही साफ करणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे टोलचे अधिकारी यांनी दिली.
– अक्षदा बांडेहवालदार, सरपंच, श्रीरामनगर