पुणे – पुणे शहर पोलिसांनी मागील दहा वर्षांत शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, अपघात अशा घटना सातत्याने घडलेल्या ठिकाणी तब्बल 2,800 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. शहरातील आस्थापनांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या “फायबर ऑप्टिक कनेक्शन’ला जोडण्यात येतील. यामुळे सर्व महत्वाचा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.
एका कार्यक्रमासाठी जनीश शेठ पुणे दौऱ्यावर होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक आदी यावेळी उपस्थित होते. “शहरात सध्या महापालिका आणि पोलिसांनी 1,400 सीसीटीव्ही बसवले आहेत. हे प्रामुख्याने वाहतुकीच्या दृष्टीने आहेत. मात्र, गुन्हेगारांच्या तपासासाठीही ते महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. पुणे पोलिसांनी मागील दहा वर्षांत शहरात घडलेल्या गुन्हेगारीचा आढावा घेऊन सर्वेक्षण केले आहे.
ज्या ठिकाणी सातत्याने गुन्हे घडले आहेत ती ठिकाणे मार्क केली आहेत. आता ही सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतील. यासाठी नव्याने 2,800 सीसीटीव्ही लावले जात आहेत. सध्या 124 चौकांमध्ये सीसीटीव्ही आहेत, तर उरलेल्या 135 ठिकाणी ते बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीसाठी शहरातील सर्व खासगी-सार्वजनिक कार्यालये, संस्था, प्रतिष्ठानांची मदत घेतली जाणार आहे. असे सुमारे दहा हजार सीसीटीव्ही पहिल्या टप्प्यात जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले जाणार आहे,’ असे रजनीश शेठ म्हणाले.