पुणे – राज्यातील महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे व कोट्यांतर्गत जागांच्या प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाने जाहीर केले आहे. दि.8 जून पासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंद नोंदवावे लागणार आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक
दि. 8 ते 12 जून- नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-1 भरणे, प्रवेश अर्जाचा भाग-2 भरणे, माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राद्वारे अर्ज प्रमाणित करुन घेणे, कोटा प्रवेशासाठीही नोंदणी करता येणार.
दि. 12 जून- सांयकाळी 4 पर्यंत अर्जाचा भाग-1 भरणे.
दि. 13 ते 15 जून – अर्जाचा भाग-1 भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे, गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, गुणवत्ता यादी दुरुस्तीबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी निराकरण करणे.
दि. 15 जून – अर्जाचा भाग- 2 ची सुविधा रात्री 10 वाजता बंद होणार.
दि. 16 ते 18 जून- डेटा प्रोसेसिंग कार्यवाही, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे व त्याचे विभागीय समितीकडून पूर्व परीक्षण करणे.
दि. 19 मार्च- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यायल निवड यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्यांचे प्रवेशाचे महाविद्यालय दर्शविणे, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देणे, कटऑफ पोर्टलवर दर्शविणे.
दि. 19 ते 22 जून – विद्यार्थ्यानी आवश्यक कागदपत्र अपलोड करुन अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीची प्रतीक्षा करणे, पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग-1 भरणे.
दि. 22 जून- महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणे, कोट्यातील रिक्त जागा कॅपकडे समर्पित करणे.
दि. 23 जून- दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे, याप्रमाणे वेळापत्रक असेल.
निश्चित केलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास?
महाविद्यालयात निश्चित केलेला प्रवेश एखाद्या विद्यार्थ्यास रद्द करावयाचा असल्यास संबंधित महाविद्यालयास विनंती करून पुढील प्रक्रिया करता येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे.