आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 10 दिवसांवर आला आहे. 11 जूनला सायंकाळी माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरूवारी (दि. 1 जून) आळंदीत येऊन माऊली मंदिरासह इतर ठिकाणांची पाहणी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक वारकरी आळंदीत दाखल होतात. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आळंदीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी माऊली संस्थानचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी आयुक्त विनयकुमार चौबे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.