35 प्रवासी वाचले ः पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ घटना
मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लाल परीची म्हणजे एसटी बसची मागची दोन्ही चाके निखळल्याची घटना मंचर (ता. आंबेगाव) जवळील शेवाळवाडी येथे घडली. उर्वरित चार चाकांवर बस काही सेकंद धावली. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरूप आहेत.
याबाबत माहिती अशी की, परेल एसटी आगाराची परेल-नारायणगाव एस टी बस (एमएच 20 बीएल 3618) पुुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचरजवळील शेवाळवाडी परिसरात आल्यावर या बसच्या ड्रायव्हर साईडच्या मागे असलेल्या एका बाजूची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे, तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले.
बस तिरकी होऊन रस्त्यावरच तिरपी धावत गेली. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. दोन्ही चाके निघून गेल्यावर बस चार चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या.
मात्र, चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. राजगुरूनगर एसटी आगाराच्या दुरुस्ती पथकाने येऊन एसटी बस दुरुस्त केल्याची माहिती मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम. डी. शिंदे यांनी सांगितले.