मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या ती ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये राणीने मुलगी आदिराबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. इतकेच काय तर 7 वर्षांच्या आदिराला ती मराठी शिकवत असल्याचेही राणीने सांगितले.
अभिनेत्री करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये राणी मुखर्जीने हजेरी लावली होती. यावेळी करिनाने तिला आदिराच्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. यावर राणी म्हणाली, “आदिरा खूप हुशार आहे. मला तिला वेगवेगळ्या भाषा शिकवायच्या आहेत. तिला शाळेत शिकलेल्या भाषेपेक्षा वेगळी भाषा शिकवायची आहे, जेणेकरून ती जगात कुठेही गेली तरी तिला त्या भाषेत बोलता येईल.”
पुढे ती म्हणाली, “सर्वात आधी तिने शुद्ध हिंदी बोलायला आणि लिहायला शिकावे अशी माझी इच्छा आहे. ती शाळेत इंग्रजीसोबतच हिंदीही चांगली शिकत आहे. ती तिच्या वर्गातली एकमेव मुलगी आहे जी चांगली हिंदी बोलते. ती मराठीही शिकत आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे तिला मराठी भाषा येणं महत्त्वाचे आहे. ”
दरम्यान, राणी आणि आदित्य चोप्रा यांना आदिरा ही 7 वर्षांची मुलगी आहे. राणीने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. चित्रपटातील अभिनयामुळे तिचे नेहमीच कौतुक केले जाते. मध्यंतरी काही काळ सिनेक्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतर तिने पुन्हा एकदा धडाकेबाज एंट्री करत अभिनयाला सुरूवात केली. मात्र सुप्रसिद्ध अभिनेत्री असूनही राणीने तिच्या लेकीला लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे.