पिंपरी, दि. 30 – गेल्या वर्षी मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅनद्वारे नो-पार्किंगमधील वाहनांवरील कारवाईला सुरवात झाली. एक वर्षभरात यातून महापालिकेच्या तिजोरीत 96 लाख 28 हजार 800 रुपये जमा झाले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वाहन चालकांना शिस्त लागावी आणि पे ऍन्ड पार्कच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न मिळावे, यासाठी टोईंग व्हॅनद्वारे कारवाईला सुरवात झाली. या कारवाईसाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना सात टेम्पो व एक क्रेन उपलब्ध करून दिले. प्रत्येक कारवाईतून टोईंग चार्जेस म्हणून दुचाकीस्वारांकडून 200 रुपये, नो-पार्किंग चार्जेस म्हणून 500 रुपये आणि जीएसटीसाठी 36 असे एकूण 736 रुपये घेतले जात आहेत.
आत्तापर्यंत महापालिकेला एकूण 96 लाख 28 हजार 800 रुपये वाहतूक पोलिसांकडून जमा झाले. त्यातील 46 लाख 8 हजार रुपये टोईंग व्हॅनचे भाडे देण्यात आले. पे ऍन्ड पार्कमध्ये चालकांनी वाहने उभी करावी हा या कारवाईमागचा महापालिकेचा मुख्य हेतू होता.
वाहतूक पोलीस वाहन उचलण्यापूर्वी मेगाफोनद्वारे संबंधित वाहनाचा नंबर पुकारतात. मात्र वाहन चालक तिथे न आल्यास संबंधित दुचाकी वाहन उचलून टेम्पोत टाकून वाहतूक शाखेत नेले जाते. तिथे तडजोड शुल्क आकारून सोडून दिले जाते.
कारवाईत भेदभाव?
दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी सात टेम्पो आहे. मात्र चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी केवळ एकच क्रेन देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप दुचाकीस्वारांकडून केला जात आहे.