पुणे -महवितरणच्या वीज ग्राहकांची ऑनलाइन वीजबिल भरताना बनावट मेसेजद्वारे फसवणूक होत असल्याबाबत राज्यात 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच महावितरणचा कोणताही डेटा लीक झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणाच्या ग्राहकांची बनावट संदेशाद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
महावितरणच्या वीज ग्राहकांचा रजिस्टर मोबाईल नंबरचा डेटा लीक झाल्यामुळेच ऑनलाइन देयकाबाबत बनावट संदेश पाठविण्यात येत आहेत का? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपख्यमंत्री फडणवीस यांनी डेटा लीक झाला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बनावट एसएमएस महावितरणकडे नोंदणीकृत असलेले किंवा नसलेले मोबाईल क्रमांकावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारच्या संदेशामध्ये ग्राहकांचा वैयक्तिक तथा वीजबिलासंबंधी तपशील आढळून येत नाही. तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी बनावट संदेशाद्वारे फसवणुक करणाऱ्या संदेशाला प्रतिसाद न देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.