बारामती-छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या, असे निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना दिले. येथील ऐतिहासिक गडकोटांच्या संरक्षण संवर्धनाचा मुद्दाही त्यांनी त्यांच्यासमोर मांडला.
केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. लेखी पत्रही दिले. बारामती लोकसभा मतदारसंघातील किल्ले सिंहगड, पुरंदर, राजगड आणि इतर गडकोट पहायला येण्याचे निमंत्रण त्यांनी रेड्डी यांना दिले. बारामती लोकसभा मतदारसंघाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमितील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण संवर्धन व्हावे. यासाठी केंद्र सरकारने काही ठोस कार्यक्रम आखून त्यानुसार कामे करायला हवीत, असे त्यांनी रेड्डी यांच्या लक्षात आणून दिले.
एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक गडकोट, परदेशी पक्षी आणि पर्यटनदृष्ट्या अन्य महत्वाची ठिकाणे पाहून त्या जागा, ठिकाणे अधिकाधिक उत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही प्रयत्न करण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांना केली. पर्यटन मंत्री मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा विश्वास यावेळी सुळे यांनी व्यक्त केला.