पिंपरी – मेट्रोचे काम सुरू असल्याने सुमारे अडीच ते तीन वर्षे बीआरटी मार्गातील बस वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला होता. आता पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोही धावू लागली आहे. पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक काम पूर्ण झाल्याचा मेट्रोकडून दावाही करण्यात येत आहे. परंतु अजूनही मेट्रोकडून बीआरटीचा मार्ग अडविला जात आहे. कासारवाडी येथे बीआरटी मार्गातच विशालकाय लोखंडी सांगडे ठेवण्यात आले आहेत.
शहरातील बीआरटी नियोजनाचा बोजवारा उडाला असतानाच आता मेट्रोच्या कामाची भर पडत आहे. कासारवाडी येथे मोठा लोखंडी सांगाडा बीआरटी मार्गात ठेवल्याने पीएमपीएमएलला त्याचा अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावरून बसेसना धावण्याची वेळ येत आहे. जलद आणि वेळेत पोहचता यावे, यासाठी सुरू केलेल्या बीआरटी मार्गात अनेक अडथळ्यांची शर्यत पीएमपीएमएलला पार करावी लागत आहे. दुचाकी, चारचाकी वाहने नियमबाह्य पद्धतीने यामधून मार्ग काढत आहेत. तसेच अजूनही ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू असल्याने मेट्रोकडून विविध साहित्य ग्रेडसेपरेटरसह बीआरटी मार्गातही ठेवले जात आहे.
जुना मुंबई पुणे महामार्गावरून पिंपरीकडे येताना कासारवाडी येथे बीआरटी मार्गातच मेट्रोच्या वतीने मोठा लोखंडी सांगाडा ठेवला आहे. या ठिकाणी मेट्रो स्टेशन, लिफ्टची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारे साहित्य बीआरटीत ठेवले जात आहे.