कराड (सातारा) – तळबीड (ता. कराड) पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल 83 लाख 9 हजार 296 रुपयांचा गुटखा व वाहतूक करणारा 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे. तळबीड ठाण्यांतर्गतची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर ही दमदार कामगिरी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात उत्पादन व विक्रीवर बंदी असलेल्या गुटख्याची कर्नाटक राज्यातून आयशर ट्रकमधून (केए 32 एए 3770) गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर यशवंतनगर (ता. कराड) येथील विठ्ठल मंदिरासमोर पहाटे पावणेचार वाजता हे वाहन ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या खाद्य पदार्थांची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे, वंदना रूपनवर यांनी केली.
वाहतूक करणारे मोहम्मद ताजुद्दीन सैफुलसाब बालवाले (रा. नरोना, ता. आलम जि. गुलबर्गा, कर्नाटक) व मेहबूब बाबुमिया (रा. उडबल ता. हुमनाबाद जि. बिदर) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 83 लाख 9 हजार 296 रुपयांचा गुटखा व 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 1 कोटी 13 लाख 9 हजार 296 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहयक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, उपनिरीक्षक गोपीचंद बाकले, हवालदार आप्पा ओंबासे, शहाजी पाटील, निलेश विभुते, महेश शिंदे यांनी केली.