नेवासा – नगर – औरंगाबाद महामार्गावरील पांढरीचापूल येथे उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवार (दि.१२) रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (एम.एच १४ ए.एल ९५३१) या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहूक ट्रक (क्र.एम.एच १६ ई.सी ७०११) या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भिषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, पाठीमागून धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर होऊन दोन्ही मालवाहतूक ट्रक मधील कांद्याच्या गोण्या रस्त्यावर पडल्या होत्या.
अनेक दुचाकीस्वार त्यावरून घसरून जखमी झाले आहेत. दोन्ही ट्रकमध्ये किती व्यक्ती होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दोन्ही ट्रकला बाजूला करण्याचे काम सुरु होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.