पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. हिंदू महासभेचे आनंद दवेही या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या संपूर्ण पुण्यात याच निवडणुकीची चर्चा असताना, अश्यातच कवी मनाचे नेते आणि बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं दिसून आलं आहे.
मात्र, आता निवडणुकीपूर्वीच बिचुकले यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजीत बिचुकलेंवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार लहुजी छावा संघटनेनं दिलीय. त्यामुळे कसबा विधानसभेच्या निवडणुकीआधी शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना कुटुंबासह अभिजीत बिचुकले अर्ज भरण्यासाठी पोहोचले होते. कसब्यातून उमेदवारी भरत असल्यामुळे कसबा मतदारसंघाचे प्रश्न काय? कसबा मतदारसंघ नेमका कसा आहे? असे काही प्रश्न पत्रकारांनी विचारले. आणि याचदरम्यान बिचुकलेंची अनेक मुद्यांवरून बाचाबाची झाली असून, तेच प्रकरण आता त्यांच्या अंगलटी येण्याची दाट शक्यता आहे.