सेऊल – दक्षिण कोरिया आणि जपान दरम्यान एक मालवाहू जहाज बुडाले आहे. आज पहाटेच्या सुमारास हे जहाज बुडाल्याने या जहाजावरील 22 पैकी 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे, असे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचवण्यात आलेल्यांपैकी 9 जण बेशुद्ध आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना अधिक उपचारांसाठी जपानला हलवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
* दक्षिण कोरिया-जपान दरम्यान जहाज बुडाले
*13 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
* बेपत्ता 8 कर्मचाऱ्यांचा शोध सुरू
बेपत्ता असलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा जपान आणि दक्षिण कोरियाच्या तटरक्षक दलाच्या नौका, हेलिकॉप्टर आणि विमाने या परिसरात शोध घेत आहेत. दोन व्यवसायिक जहाजेदेखील या शोधकामामध्ये सहभागी झाली आहेत. मात्र सोसाट्याचा वारा आणि उसळणाऱ्या लाटा यामुळे या शोधकामामध्ये अडथळे येत आहेत, असे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुडालेल्या जहाजावरील 13 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून यापैकी 5 चिनी कर्मचारी जिवंत असल्याचे जपानच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे.
तब्बल 6,551 टन वजनाचे रिन टियान हे मालवाहू जहाज आज पहाटेच्या सुमारास जपानच्या स्वायत्त आर्थिक झोनमध्ये असताना बुडाले. या जहाजाने मदतीसाठी रात्री सव्वा 11 वाजता संदेश पाठवला होता. त्यानंतर साडे तीन तासांनी हे जहाज बुडाले, असे जपानच्या तटरक्षक दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
मागील कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा मोदींच्या काळात देश अधिक कर्जबाजारी
जहाजाच्या कप्तानाने रात्री 2.41 वाजता सॅटेलाइट फोनच्या आधारे कोस्टगार्डशी संवाद साधला होता. जहाजावरील कर्मचारी जहाज सोडून देणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते, असे जेजू बेटावरील कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हॉंगकॉंगच्या मालकीचे जहाज…
हॉंगकॉंगची नोंदणी असलेल्या लॉंग ब्राइट शिपींग लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे हे जहाज 3 डिसेंबरला मलेशियाच्या पोर्ट क्लांग बंदरातून निघाले होते आणि जळाऊ लाकूड घेऊन दक्षिण कोरियाच्या इन्चियोन बंदराकडे निघाले होते. जपानच्या नागासाकीच्या नैऋत्येला 160 किलोमीटरवर आणि दश्रिण कोरियाच्या जेजू बेटाच्या दक्षिणेला सुमारे 150 किलोमीटरवर असताना हे जहाज बुडाले. या जहाजावर चीनचे 14 आणि म्यानमारचे 8 कर्मचारी होते. दक्षिण कोरियाच्या कोस्ट गार्डने 6 जणांना, एका मालवाहू जहाजाने 5 जणांना आणि जपानच्या विमानाने 3 जणांना वाचवले आहे, असे जेजू बेटावरील कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.