नेवासा (प्रतिनिधी) – शनि शिंगणापुर येथे आज शनिअमावस्या यात्रा निमित्त आठ लाखांहून अधिक भाविकांनी भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले.दुपारी तीन वाजता वाहनतळ परीसरात वाहतुक कोंडीचा मोठा त्रास भक्तांना सहन करावा लागला. अमावस्या लागण्यापुर्वी नेहमी प्रमाणे पहाटे साडेचार वाजता होणारा आरती सोहळा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दुपारी १२ वाजता मध्यान आरती झिम्बांवेचे शनिभक्त जयेश शहा व ऑस्ट्रेलियाचे उद्योजक राकेशकुमार यांच्या हस्ते झाली. सायंकाळची सुर्यास्त आरती ओरिसाचे आरोग्य मंत्री नब किशोरीदास व तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरायांच्या हस्ते झाली.
सोनई, घोडेगाव व इतर रस्त्यावर जवळच्या टप्प्यात वाहनतळ केले खरे मात्र भाविकांच्या प्रचंड गर्दीने वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. वाहनतळ येथे पुजा साहित्याचे एजंट व लटकूंनी रिक्षा व मोटारसायकलवर भाविकांना ठराविक दुकानात नेवून सक्तीने पुजा साहित्य दिले.विशाल भंडारा मित्र मंडळ(दिल्ली) मेहतानी ग्रुप,अशोक गर्ग मित्र मंडळ,पंकज मित्तल परीवारसह मुंबई येथील भक्तांनी मोफत महाप्रसाद वाटप केले.अनेक भक्तांनी चप्पल,छत्री,मिठाई व उबदार कपड्यांचे वाटप केले.
देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात मान्यवर भाविकांचा सन्मान युवानेते उदयन गडाख यांनी केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त मंडळ,माजी विश्वस्त उपस्थित होते.ओरिसाचे आरोग्यमंत्री नब किशोरीदास, हिवरेबाजारचे पद्मश्री पोपटराव पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीएस दिलीप राजुरकर,परिवहनचे आयुक्त विवेक बिमनवार यांनी भेट देवून दर्शन घेतले.