पुणे -लोहगाव विमानतळ परिसरात ओला आणि उबेरसाठी असलेले पार्किंग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ओला आणि उबेर वाहनचालकांना दि. 27 जानेवारीपासून त्यांच्या कार मल्टीलेव्हल पार्किंगमधे उभ्या करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. विमानतळ प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता परिसरात पाच मजली मल्टी लेव्हल पार्किंग उभारले आहे. या ठिकाणी दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळेच विमानतळ प्रशासनाने ओला उबेरला त्या ठिकाणी त्यांचे वाहने उभी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विमानतळ आवारात वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
लोहगाव विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी खासगी गाड्यांबरोबरच दिवसभरात ओला-उबेरच्या गाड्या येथे उभ्या असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.
लोहगाव विमानतळ येथे ओला उबेरची साधारण तीन हजार वाहने दिवसभरात या ठिकाणी येतात. विमानतळ प्रशासनाने या कंपन्यांकडून शुल्क घेऊन त्यांना परिसरात जागा दिली होती. पण, आता त्यांच्यासोबतचा करार संपल्यानंतर दि. 27 जानेवारीपासून त्यांना आवारात गाड्या उभ्या न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याऐवजी एरोमॉलच्या पार्किंगमध्ये त्यांना त्यांच्या गाड्या उभ्या कराव्या, असे सूचित केले आहे. प्राधिकरणाने ओला आणि उबेर चालकांना दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार
लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांनी ओला आणि उबेरचे ऑनलाइन बुकींग केल्यानंतर बऱ्याच वेळा ही वाहने काही अंतरावर असताना बुकींग स्वीकारत होती. पण, त्यांना विमानतळ परिसरात येण्यास खूपच वेळ लागत होता. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ वेटिंगवर राहवे लागत होते. पण, आता प्रवाशांनी कारची ऑनलाइन बुकींग केल्यानंतर ते थेट मल्टीलेव्हल पार्किंगमध्ये जातील. त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेला क्रमांक दाखविल्यानंतर उपलब्ध असलेली कार त्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.