पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक वाद नसल्याचे कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले. तसेच राज ठाकरेंना आपण नक्की भेटू, असेही ते म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातील वादावर पडदा पडल्याची राजकीय चर्चा आहे.
पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 65व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती
स्पर्धेत अंतिम फेरीसह बक्षीस वितरण समारंभासाठी संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सिंह यांना आमंत्रित केले आहे. त्यासाठी सिंह हे शनिवारी सकाळी पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी काही विषयांवर प्रश्न विचारले.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादाविषयी सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, सिंह यांना पुण्यात पाय ठेवू दिले जाणार नसल्याचा इशारा काही महिन्यांपूर्वी मनसेने दिला होता.
मात्र, राज्यात भाजप-शिंदे सरकार आल्यानंतर तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपमध्ये असलेल्या जवळीकतेमुळे मनसेचा सिंह यांना आधीच विरोध कमी झाला होता. त्यातच शनिवार पुण्याता होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे सिंह यांना विरोध होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र सिंह यांनीच पुण्यात येताच, या वादावर पडदा टाकल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राकडून नेहमीच प्रेम मिळाले
मला येथे येऊन छान वाटत असून, महाराष्ट्राच्या जनतेकडून आजपर्यंत मला नेहमीच प्रेम मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कुस्ती परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. तर तुम्ही त्यांना भेटणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, कार्यक्रम कसा आहे, याबाबत मला माहिती नसल्याचे ते म्हणाले.