“अमेरिकेस रशियाचा विनाश करता येईल!’
वॉशिंग्टन, दि. 12 – रशियाबरोबर सलोखा करण्यासाठी अमेरिका अगदी आग्रहपूर्वक प्रयत्न करील; पण जर युद्ध झालेच तर रशियाचा विनाश करण्यास अमेरिका समर्थ आहे’, असे निर्वाचित अध्यक्ष कार्टर यांच्या परराष्ट्रीय धोरणविषयक सल्लागारांनी काल सिनेट समित्यांच्या सदस्यांना सांगितले.
नियोजित संरक्षणमंत्री हेरॉल्ड ब्राउन म्हणाले की, अमेरिकेविरुद्ध “अण्वस्त्रयुद्ध’ पुकारण्याचा रशियाचा हेतू आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही व अमेरिकेला याबाबत साशंकतेतच राहावे लागणार आहे. पण जर तसे युद्ध झालेच तर अमेरिका हल्ला जोरदारपणे परतवून लावून रशियाचा विनाश करू शकेल.
पुण्यात सर्वत्र पाणीमीटर्स बसविले जाणार
पुणे – प्रतिदिनी 35 लाख गॅलन पाणी वापरणाऱ्या पुणेकरांना यापुढे वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी योग्य तो मोबदला भरावा लागणार आहे. संपूर्ण पुण्यात येत्या 5 वर्षांत पाण्याचे मीटर्स बसविण्यात यावेत असा निर्णय महापालिकेत घेण्यात आला आहे.
पुण्यात रोज 35 लाख गॅलन पाणी वापरात येते व त्यापासून अवघे 35 लाख रुपयांचे उत्पन्न वर्षाला मिळते. म्हणून सरसकट 15 टक्के पाणीपट्टी वाढविण्यात येणार होती; परंतु यास विरोध झाला. पाण्याचा अनावश्यक वापर व त्यामानाने पाणीपट्टीची कमी वसुली यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेतला. पुण्यात मीटर्स बसविण्यासाठी अंदाजे 3 कोटी रुपये खर्च येईल.